हसणारा बुद्ध (Laughing Buddha) अर्थात बुदाई (Budai) हा चीनी भिक्षु
![]() |
बर्मिंगहॅम UK येथील हसत्या बुद्धाची मूर्ती Wikipedia |
हसणारा बुद्ध व मूळ बुद्ध/ सिद्धार्थ गौतम यांच्यामध्ये निश्चितच मोठा फरक आहे. या दोन्ही वेगळ्या व्यक्ती होत. हसणाऱ्या बुद्धाचे खरे नाव बुदाई असे होते. बुदाई हे प्राचीन चिनी भिक्षू “क्वी चि” (Qici) यांचे टोपणनाव आहे. काही ठिकाणी त्यांना ‘मैत्रेय बुद्ध’ म्हणून ओळखले जाते. चान पंथीय बौद्ध धर्माच्या प्रसाराबरोबरच त्यांचाही इतरत्र प्रसार झाला. ते १०व्या शतकात वुयुए (Wuyue) राज्यात राहत होते. लाफिंग बुद्धाविषयी अनेक कथा प्रचलित आहेत.
“बुदाई” या नावाचा अर्थ “कापडाची पिशवी” असा होतो. ते नेहमी फिरत असताना जी कापडाची भलीमोठी पिशवी घेऊन चालत असत त्यावरून हे नाव पडले. त्यांचा हसमुख स्वभाव, विनोदी व्यक्तिमत्व आणि अनोखी जीवनशैली यामुळे ते इतर बौद्ध गुरुंपेक्षा वेगळे ठरतात चिनी भाषेत त्यांना “हसणारा बुद्ध” असे म्हणतात.
बुदाईला जास्त वजन असलेले आणि मोठे पोट असलेले चित्रित केले जाते. त्यांच्याबद्दलच्या अनेक कथांमध्ये त्यांची खाण्यापिण्याची आवड येते. त्यामुळेच विशेषतः पश्चिम जगतात त्यांना “लठ्ठ बुद्ध” (Fat Buddha) असेही म्हणतात.
बुदाईबद्दलची माहिती “दिव्याचे हस्तांतरण” (The Transmission of the Lamp) या चान बौद्ध भिक्षूंच्या चरित्रांच्या संग्रहातून मिळते. बुदाई हे साधे कपडे घालत आणि फक्त गरजेपुरत्या वस्तू कापडाच्या पिशवीमध्ये ठेवत. गरीब असले तरी ते समाधानी असत. त्यांच्या मागे येणाऱ्या मुलांचे ते आनंदाने मनोरंजन करत असत. समाधान आणि भरभराटीचे प्रतीक म्हणून त्यांच्या मूर्ती चीनी संस्कृतीत सर्वत्र दिसतात.
बुदाई त्यांच्या अनुभव व शिक्षण यावरून लोकांना हवामानाचे अंदाजही सांगत होते. ते ऐकण्यासाठी त्यांच्या सभोवताली लोक जमत असत. ९१६ किंवा ९१७ च्या सुमारास लिहिलेल्या त्यांच्या मृत्यूच्या नोंदीनुसार, ते स्वतःला “मैत्रेय, भविष्यातील बुद्ध” (Maitreya, the Buddha of the Future) असल्याचे सांगत. चीनमधील फेंघुआ जिल्ह्यातील युएलिन मंदिराच्या (Yuelin Temple) मुख्य सभागृहाच्या पूर्वेकडील भागात बुदाईचे शरीर संरक्षित असल्याचे सांगितले जाते.
चीनमधील चेंग मिंगच्या काळात (इ.स. ९१७), बुदाई यांनी त्यांच्या परिनिर्वाणाची वेळ जवळ येत असल्याचे जाहीर केले. ते युएह-लिन मंदिरात गेले आणि पूर्वेकडील एका सपाट दगडावर बसले. बसल्या बसल्या त्यांनी एक श्लोक म्हटला. श्लोक म्हणून झाल्यावर ते शांतपणे निधन पावले. आता युएह-लिन मंदिराच्या पूर्वेकडील मुख्य सभामंडपात त्यांचे शरीर ठेवलेले आहे.
बुदाई याला नेहमीच मोठ्या झोळ्यासारख्या कपड्याच्या थैलीसह दाखवले जाते. ही थैली चान पंथीय बौद्ध धर्मात एक महत्त्वाची वस्तू आहे. ती समृद्धी, सुख आणि समाधान दर्शवते. १३ व्या शतकाच्या आसपास चान बौद्ध धर्म जपानमध्ये 'झेन बौद्ध धर्म' म्हणून आला. तेथील धर्मप्रेमी लोकांनी 'झेन' कलांच्या 'जागरण' या काळात महत्त्वाच्या पात्रांची चित्रे काढली. झेन परंपरेत समाविष्ट झालेल्या अनेक आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वांमध्ये बुदाई आधीपासून जपानमध्ये प्रसिद्ध होते. झेन गुरु हकूइन एकाकु यांच्या चित्रे आणि मूर्तींमध्ये बुदाई अनेक विविध कृत्यांमध्ये दिसतो- रस्त्याने जाणार्या लोकांचे मनोरंजन करणे, मुलांना छत्रीखाली आश्रय देणे, त्याची थैली उशाला ठेवून ध्यान करणे इत्यादी स्वरुपात त्यांच्या मुर्त्या तयार केल्या आहेत.
![]() |
सांची स्तूपवारील यक्ष |
लाफिंग बुद्धाची मूर्ती साधारणपणे चीनमधल लोकाकथांवरून (दहाव्या शतकातली) चीनी मूळाची असल्याचे मानले जाते. पण, त्याचप्रमाणे दिसणाऱ्या यक्षांची मूर्ती सांचीच्या स्तूपाच्या पश्चिम दरवाजावर कोरलेली होती. हा सांचीचा स्तूप सम्राट अशोकाने इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात बांधला होता. ते शिल्प हसणाऱ्या बुद्धाशी साम्य दाखवते. अर्थात हा संशोधनाचा विषय आहे.
तथापि फेंग शुई व इतर अंधश्रद्धाळू कल्पनांमध्ये लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात ठेवल्याने संपन्नता येते असे मानण्यात येते. ती अंधश्रद्धा दूर व्हायला हवी. काही लोक केवळ कलात्मक वस्तू म्हणून घरात किंवा ऑफिसच्या टेबलावर "लाफिंग बुद्धा" ठेवतात. लाफिंग बुद्धा हा गरीब असूनही हसतमुख, समाधानी, सुखी आणि आनंदी वृत्तीचा दिसतो. चीन, जपान, कंबोडिया, व्हिएटनाम, थायलंड, मंगोलिया, मंचूरिया, ताइवान, लाओस आणि अनेक इतर देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी त्याचा प्रचंड प्रसार झालेला आहे.
- धनंजय आदित्य
नेटवरील विविध ठिकाणच्या संग्रहित माहितीवरून.
#आदिनामा #चीन #झेन #लाफिंगबुद्धा #adinama #china #zen #laughingbuddha